पौड – मुळशी तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीराम भूमिपूजन सोहळा वैयक्तिक पातळीवर दिवाळीप्रमाणे घरातूनच साजरा करण्यात आला. यावेळी रांगोळी काढून दिवे लावून आणि गोड पदार्थ करून हा सण साजरा करावा; परंतु हे करताना करोना साथीचे भान ठेवावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे यांनी मुळशी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले होते.
भाजप मुळशी तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे यांनी खूबवलीमध्ये राहत्या घरी श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त घरातूनच श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन केले आणि कुटुंबातील सर्वांनी मिळून आरती केली. त्यानंतर नैवद्य दाखवण्यात आला, तसेच घरासमोर हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून भगव्या रंगाची गुढी उभारून तिची पूजा करण्यात आली.