उपाययोजनांची लेखी माहिती सदस्यांना द्या : महापौर
पुणे – “पालिका प्रशासनाने करोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा हिशेब तर घेणार आहेच. पण, सर्व अधिकारी आणि विभागप्रमुख कोविडच्या कामातच व्यस्त आहेत. त्यांनी केलेल्या उपाययोजनांसंदर्भात लेखी माहिती सदस्यांना द्यावी, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत,’ असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
“आपत्कालिन परिस्थितीत प्रशासनाला अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपाययोजनांशी संबंधित विषय मंजूर करावेच लागणार आहेत. मात्र, याचा अर्थ असा नाही की त्यांना सूट दिली आहे. त्यांना त्या सगळ्या खर्चाचा हिशेब द्यायचा आहेच. मुख्यसभेत हा विषय न घेण्याचे कारण म्हणजे मुख्यसभा आणि अन्य सभा ऑनलाइन घ्याव्यात, असे शासनाचे आदेश आहेत.
सगळ्याच सदस्यांना करोना विषयावर बोलायचे आहे. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. परंतु त्यांचे उत्तर आले नाही. हा केवळ पुणे महापालिकेचा नव्हे, तर सगळ्या महापालिकांचा विषय आहे.
पुढच्या सभेपर्यंत आदेश आले तर मुख्यसभा अशीच पुढे चालवू. वस्तुत: वेळोवेळी पक्षनेत्यांबरोबर बैठका झाल्या आहेत. आढावा बैठकांनाही पक्षनेते उपस्थित होते. त्यामुळे केलेला खर्च आणि उपाययोजनांची माहिती नव्हती किंवा नाही असे म्हणता येणार नाही. तरीही प्रशासनाची बाजू घेणारच,’ असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
खासगी रुग्णालयात उपचार घेताना ज्या करोना बाधिताचे बिल दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आले आहे, त्या रुग्णालयांची चौकशी केली जाणार आहे. तसेच या रुग्णालयांचे प्री-ऑडिट करण्यात येईल.
– विक्रम कुमार, आयुक्त, मनपा