मंत्री वळसे पाटील यांचे शिरूर तालुका प्रशासनास निर्देश
सविंदणे (वार्ताहर) – शिरूर, रांजणगाव एमआयडीसी, पाबळ, न्हावरे व शिक्रापूर येथे सुमारे 700 बेडच्या कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. याकामी खासगी डॉक्टरांची विशेष मदत घेत आवश्यक तिथे खासगी रुग्णालय ताब्यात घेण्याच्या सूचना कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर शहर, तालुका प्रशासनास दिले आहेत.
रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरुर) येथे शिरूर तालुक्यातील करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार अशोक पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री वळेस पाटील म्हणाले की, करोनाप्रतिबंधक उपाययोजना करण्यासोबतच शिरूर तालुक्यात आणखी पाच ठिकाणी कोविड केअर सेंटरची तातडीने उभारणी करण्यात यावी, तसेच ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोविड आरोग्य केंद्र येत्या पाच दिवसांत सुरू करा, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी राम म्हणाले की, आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करताना पायाभूत सुविधा आवश्यक मनुष्यबळ आणि निधी कमी पडू दिला जाणार नाही. नवीन कोविड सेंटरमध्ये आवश्यक सोयीसुविधा, जैववैद्यकीय कचरा व भोजन व्यवस्था तसेच उपचारांबाबत दक्षता घ्या, यासंदर्भात कोणतीही तक्रार येता कामा नये, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
दोन हजार अँटिजेन किट देणार
शिरूर तालुक्यासाठी दोन हजार अँटिजेन किट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.