रांची – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्पर्धेत स्वतःची कामगिरी व तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नई सुपर किंग संघाने धोनीचा नवा लूकही नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध केला असून त्याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर लाइक केले आहे.
मार्चमध्ये ही स्पर्धा होणार होती. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली होती. आता ही स्पर्धा अमिरातीत होणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे सर्वच संघ तयारीला सुरुवात करतील. अर्थात, त्यापूर्वी बीसीसीआयला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार असली तरीही सध्यातरी या स्पर्धेला अमिरातीत आयोजित करण्याबाबत नकार दिला जाईल, अशी शक्यता नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
याच स्पर्धेत सरस कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी धोनी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर धोनीने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गेल्या मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतून सरस कामगिरीच्या आधारे भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी तो सज्ज झाला होता. मात्र, त्याचवेळी करोनाचा धोका वाढला व ही स्पर्धाच लांबणीवर टाकली गेली.