मुंबई –ऑगस्ट 6 रोजी रिझर्व्ह बॅंक पतधोरण जाहीर करणार आहे. याकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.
गेल्या एक वर्षात रिझर्व्ह बॅंकेने अभूतपूर्व पुढाकार घेऊन रेपोदरात 1.35 टक्क्यांची कपात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या आग्रहामुळे व्यवसायिक बॅंकांनी आपल्या विविध कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. दरम्यानच्या काळात महागाई वाढली आहे. मात्र तरीही एक वेळ रिझर्व्ह बॅंक महागाईकडे दुर्लक्ष करून व्याजदरात आणखी पाव टक्के कपात करेल असे काही विश्लेषकांना वाटते. तर भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीयांची संख्या पाहता रिझर्व्ह बॅंक यावेळी महागाई रोखण्यास प्राधान्य देऊन व्याजदर कपात टाळेल, असे काही विश्लेषकांना वाटते.
दरम्यान बऱ्याच आठवड्याच्या तेजीनंतर सरलेल्या आठवड्यांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1.35 टक्क्यांनी कमी झाला. या आठवड्यात भारतातील मोठ्या कंपन्यांचे बाजारमूल्य 1.3 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. या आठवड्यात पतधोरणाशिवाय औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील पीएमआय निर्देशांक जाहीर होणार आहेत. काही मोठ्या कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. स्थूल अर्थव्यवस्थेचे स्वरूप पाहता सध्या निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे.