विशाखापट्टणम – विशाल क्रेन कोसळून झालेल्या अपघातामध्ये किमान 11 जण ठार आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे. विशाखापट्टणममधील हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडमध्ये ही दुर्घटना घडली. असे पोलीस उपायुक्त सुरेश बाबू यांनी सांगितले.
दुपारी 12 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या “लोड टेस्टिंग’ केले जात असताना ही क्रेन कोसळली. या अपघातात मरण पावणाऱ्यांमध्ये शिपयार्डचे 4 कर्मचारी आणि उर्वरित कंत्राटी कामगार आहेत. या दुर्घटनेचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.
गेल्या 90 दिवसांपासून विशाखापट्टणममध्ये दुर्घटनांची मालिका सुरू आहे. एलजी पॉलिमरमध्ये गॅस गळतीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि चौघेजण अत्यवस्थ झाले होते. नंतर विशाखापट्टण कंटेनर यार्डमध्ये झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता आणि जुलै महिन्यात एका औषध कंपनीच्या गोदामामध्ये स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला होता. आता ही क्रेन दुर्घटना झाली.
या दुर्घटना होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोणतेही सेफ्टी ऑडिट केले गेलेले नाही. सरकारने सेफ्टी ऑडिट करवून घ्यावे आणि ज्या उद्योगांशी सेफ्टी ऑडिट केलेले नाही, त्यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी जन सेनाचे समर्थक राम कृष्णा यांनी केली.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी क्रेन दुर्घटनेविषयी चौकशी केली आहे. या प्रकरणातील दोषींवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांन दिले आहेत.