जम्मू – पाकिस्तानी जवानांनी प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शनिवारी केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली.
पाकच्या त्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. या गोळीबारात शहीद झालेल्या जवानाचे नाव रोहीन कुमार असे आहे. ते हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचा विवाह ठरला होता व नोव्हेंबर महिन्यात तो होणार होता, असेही सांगण्यात येत आहे.
ते सन 2016 ला लष्करात दाखल झाले होते. त्यांनी देशाची सेवा करताना जे सर्वोच्च बलिदान दिले ते देशवासियांच्या स्मरणात कायमचे राहील, असेही या प्रवक्त्याने नमूद केले. गेल्या एक महिन्यापासून पाकिस्तानी बाजूकडून भारतीय हद्दीत अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे, असे या प्रवक्त्याने नमूद केले.