पुणे : शहरात प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या करोना नियोजनाच्या लहान लहान गोष्टींची माहिती स्मार्ट सिटीच्या फेसबुक पेज, सोशल मिडीयावर अपडेट ठेवणाऱ्या पुणे स्मार्ट सिटीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पुणे भेटीची एका ओळीचीही माहिती संकेतस्थळावर दिलेली नाही. विशेष म्हणजे त्याच्या एक दिवस आधी स्मार्ट सिटीचे केंद्रीय अधिकारी कुणाल कुमार पुण्यात येऊन गेले होते. मात्र, कुमार यांच्या बैठका, त्यांनी दिलेल्या आदेशांची माहिती मात्र भरभरून देण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रशासनास मुख्यमंत्र्याचे वावडे आहे का ? की स्मार्ट सिटीलाही राजकीय रंग चढला आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील करोना नियंत्रणाच्या कामासह, शहरातील रूग्णांचे ट्रेसिंग, आकडेवारीचे विश्लेषण अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठकांसाठी माहिती आणि अहवाल तयार करण्याचे काम स्मार्ट सिटीकडून केले जाते. याशिवाय शहरात करोना नियंत्रणा संदर्भात घडणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या बैठका, शासनाकडून करोना नियंत्रणासाठी घेतले जाणारे निर्णय, लोकप्रतिनिधींकडून शहरातील करोना नियंत्रनाच्या आढावा बैठकीतील माहिती फेसबुक, स्मार्ट सिटीचे संकेतस्थळ तसेच ट्विटरदारे सोशल मिडीयावर नागरिकांपर्यंत पोहचले जाते.
त्यात करोनाच्या कालावधीत उपमुख्यंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठका, राष्टृावादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतलेली आढावा बैठक, आरोग्यमंत्री, गृहमंत्री यांनी शहराला दिलेल्या भेटी याबाबत सविस्तर माहीती आणि फोटो सुध्दा आहेत. मात्र, गुरूवारी शहरात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवसभर घेतलेल्या आढावा बैठका, त्यांना प्रशासनास केलेल्या सूचनांची एक शब्दही स्मार्ट सिटीने सोशल मिडीयावर टाकलेला नाही. एवढच काय तर त्यांच्या पुण्यातील आढावा बैठकीचा साधा फोटोही स्मार्ट सिटीने सोशल मिडीयावर अपडेट केलेला नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीला मुख्यमंत्र्यांचा विसर पडला का असा सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
‘कोवीड सारख्या विषयावर त्यांनी महत्वाच्या विषयावर त्यांनी बैठक घेतली. एका बाजूला प्रत्येक गोष्टीची माहिती देतात आणि मुख्यमंत्री साहेबांनी पुण्यात येऊन आढावा आल्यानंतर एक ओळही दिली जात नाही हे निषेधार्ह आहे.’ – पृथ्वीराज सुतार ( शिवसेना गटनेते)