कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोना चा उद्रेक झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या साडेपाच हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यातच कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेला सर्वस्वी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जबाबदार असल्याचा आरोप युवा सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या तिघांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याने युवासेना प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाली आहे. खरंतर युवा सेनेच्या वतीने प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी प्रशासनाची अंतयात्रा काढण्याचं ठरवलं होतं मात्र पोलिसांनी युवा सेना सेनेच्या कोल्हापूर अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. तसंच आंदोलन केलं तर गुन्हा दाखल होईल अशी सूचना केली.
मात्र एवढ्या वरती कोल्हापूरची युवासेना थांबली नाही. त्यांनी कोल्हापूरकर काय करू शकतात हे वेगळ्या पद्धतीने दाखवलं आहे. कोल्हापूर मध्ये सध्या आरोग्य यंत्रणा विस्कळित झाली आहे. त्यामुळे युवा सेनेच्या वतीने कोल्हापुरी स्टाईलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा बोंब मारुन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.