पुणे – आगमनानंतर दडी मारलेल्या पावसाने पुणे शहर आणि उपनगरांवर कृपादृष्टी दाखवली आहे. शहरात मागील 24 तासांत 31 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, राज्यात देखील मागील 24 तासांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 87 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी सकाळपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्याने नोकरी, व्यवसाय आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. याशिवाय शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून, रस्ते जलमय झाले होते.
धरणसाखळीही चिंब
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. खडकवासला धरण परिसरात दिवसभरात 11, पानशेत-6, वरसगावमध्ये 5 आणि टेमघरमध्ये 3 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला प्रकल्पात पाणीसाठा 9.75 टीएमसी इतका उपलब्ध झाला आहे. मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. आज पुन्हा धरण परिसरात पावसाचे आगमन झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या खडकवासला – 0.68, पानशेत-4.40, वरसगाव -3.97 आणि टेमघरमध्ये 0.70 टीएमसी पाणीसाठा आहे.