नगर -शेवगाव येथील स्वस्तधान्य दुकानदारांवर झालेल्या अन्यायकारक कारवाईबाबत 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषण करोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष मीना कळकुंबे यांनी दिली.
शेवगाव तालुक्यात गेल्या तीन महिन्यापूर्वी लॉकडाऊन काळामध्ये कोणत्याही लाभार्थ्यांची तक्रार नसताना स्वस्त धान्य दुकानावर गुन्हे दाखल करून, त्यांची दुकाने सील करण्यात आली. तसेच साठा रजिस्टर प्रमाणे दुकानांमधील माल बरोबर असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता दहा दुकानांवर कारवाई करण्यात आली.
प्रत्यक्षात जिल्हाधिकारी यांची सूचनेनुसार शेवगाव शहरातील 10 दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. सर्व दहा दुकानावरील दोष जवळ जवळ सारखेच होते. परंतु त्यातील एकूण पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाई मध्ये मागासवर्गीय दुकानदारांना टार्गेट करण्यात आले असून, त्यांच्या दुकानांचे परवाने निलंबीत करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाइचा फेरविचार न झाल्यास येत्या सात दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.