पुणे : लॉकडाऊननंतर मार्केट यार्डातील फुल बाजार उद्यापासून (शनिवार दि. 25) सुरू होणर आहे. तर, गुळ-भुसार विभागातील कामकाजासाठी आडत्यांनी केलेल्या मागणीनुसार वेळ वाढवून देण्यात आली आहे.
भुसार विभागाचे कामकाज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत तर, फळ-भाजीपाला विभागाचे पहाटे 4.30 ते दुपारी 12 या वेळेत चालणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, पुढील आदेश येईपर्यंत भुसार बाजारातील कामकाजाची वेळ हीच राहणार आहे. भुसार बाजारात येणारी अन्नधान्याची वाहने सायंकाळी 5 वाजेपर्यंत रिकामी करून घेण्यात यावीत. सायंकाळी 5 नंतर व्यवहार बंद ठेवावेत. भुसार बाजारात खरेदीसाठी आलेल्या प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असून ग्राहकांना रांगेत थांबण्यास सांगण्यात यावे. रांग लावताना दोन व्यक्तींमध्ये किमान 3 ते 4 फुटांचे अंतर असावे.
एखाद्या दुकानात गर्दी झाल्याचे आढळून आल्यास दुकान त्वरीत बंद करून कारवाई करण्यात येईल. भाजीपाला विभागातील कामकाज पहाटे 4.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहील. कांदा-बटाटा, फळबाजाराच्या कामकाजाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 2 अशी राहील.
बाजारात किरकोळ खरेदीसाठी परवानगी देण्यात येणार नाही. घाऊक स्वरुपात भाजीपाला खरेदी करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. संसर्गाला अटकाव घालण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याची सूचना बाजार आवारातील घटकांना करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.