*पुण्याच्या बाजारपेठांत खरेदीचा प्रचंड उत्साह
* तुळशीबाग, मंडई आणि लक्ष्मी रस्ता फुलला
पुणे – करोनाच्या सलग दोन लाटांनी आलेले मळभ हटल्याने पुणेकरांची दिवाळी “प्रकाशमय’ साजरी होणार आहे, असेच चित्र शनिवारी दिसून आले. सदैव रेलचेल असलेल्या तुळशीबाग, मंडई आणि लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांकडे ग्राहकांची पावले वळत आहेत. त्यामुळे व्यापारी बांधवांतही उत्साहाचे वातावरण आहे. कपडे, दिवाळीसाठी फराळाचे पदार्थ, सजावट साहित्यांच्या उलाढालीतून पुणे पूर्ववत झाल्याचेही दिसून येत आहे.
दिवाळीपूर्वीचा आणखी एक “वीकेंड’ असल्याने बाजारपेठांत शनिवारी मोठी गर्दी होती. प्रामुख्याने कपडे, पूजेचे साहित्य, गरजेच्या इतर वस्तू, सजावटीचे साहित्य, आकाशकंदील, पणत्या अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पुणेकर बाजारपेठांमध्ये येत आहेत. शहरातील कानाकोपऱ्यासह तसेच जिल्हा इतर गावांमधूनही ग्राहक खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई, रविवार पेठ, डेक्कन अशा विविध ठिकाणी असलेल्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
एकीकडे बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे, त्याचवेळी या भागातील रस्त्यांवर मात्र वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे, पार्किंगसाठी अपुरी जागा, बेशिस्तपणे लावलेली वाहने आणि उलट दिशेने वाहन चालविणारे चालक यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतूक अतिशय संथगतीने पुढे सरकत असल्याचे चित्र शहरातील रस्त्यांवर पाहायला मिळाले. पुढील काही दिवस बाजारपेठांमध्ये वाढती गर्दी लक्षात घेता योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणीदेखील अनेक नागरिक आणि व्यावसायिक यांच्याकडून केली जात आहे.
माझे गाव अमरावती आहे. दिवाळीसाठी गावी जाण्यापूर्वी घरच्यांसाठी काही गोष्टींची खरेदी करायची आहे. त्यामुळे आज मैत्रिणींसोबत खरेदीसाठी आले आहे. करोनामुळे गेले वर्षभर खरेदीचा आनंद घेता आला नाही. यावेळी मात्र पुन्हा एकदा पहिल्यासारखे वातावरण पाहून चांगले वाटत आहे.
– सायली घुमसे, खासगी कंपनी कर्मचारी
दिवाळीसाठी कुटुंबीयांना कपडे खरेदीसाठी आलो आहोत. बऱ्याच दिवसानंतर सहकुटुंब अशाप्रकारे बाहेर आलो आहोत. त्यामुळे आनंद होत आहे. गर्दीमुळे थोडी भीती वाटत आहे, पण अनेकजण मास्क वापरत आहेत. दुकानांमध्येही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे थोडा दिलासा पण वाटत आहे.
– क्षीतिजा भुसे, गृहिणी
—————–

———-