पिंपरी – पिंपरी चिंचवड महा-पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसाला विमा योजनेचा लाभ त्वरित द्या अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील कला शिक्षक राजेंद्र पुंजाहरी तुपे व वायसीएम रुग्णालयातील उपलेखापाल सिद्धार्थ गोकुळ जगताप यांचे करोनामुळे निधन झाले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना रोगावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनचे कामकाज करत असताना करोनाचा संसर्ग झाला आहे. महापालिकेने करोना विमा सुरक्षा कवच योजना यापूर्वी जाहीर केली आहे. त्या योजनेअंतर्गत एखादा कर्मचारी कर्तव्य बजावित असताना करोनामुळे मरण पावल्यास त्याच्या वारसाला विमा रक्कम मिळेल असे जाहीर केले आहे.
हे दोन्ही कर्मचारी आपले कर्तव्य बजावित असताना त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तरी त्यांच्या वारसाला विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम द्यावी. तसेच त्यांच्या वारसाला महापालिकेत नोकरीस घ्यावे व मृत कर्मचाऱ्याची पीएफ आदी रक्कम वारसाला द्यावी, अशी मागणी उपमहापौर हिंगे
यांनी केली आहे.