ब्लू चीप कंपन्या तेजीत
मुंबई – प्रदीर्घ काळापासून आघाडीवर असलेल्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे मंगळवारी शेअरबाजार निर्देशांक वाढले.
मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 511 अंकांनी वाढून 37,930 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 140 अंकांनी म्हणजे 1.27 टक्क्यांनी वाढून 11,162 अंकावर बंद झाला. रिलायन्सबरोबरच एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, मारुती, एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली असली तरी छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप 0.22 टक्क्यांनी तर स्मॉलकॅप 0.24 टक्क्यांनी कमी झाले.
औषधी आणि ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रांच्या निर्देशांकांत वाढ झाली. करोना व्हायरसवर लस येण्याची शक्यता वाढल्यामुळे जागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक आज वाढले असल्याचे दिसून आले.
बजाज फायनान्स पिछाडीवर
बजाज फायनान्स कंपनीच्या अध्यक्षपदावरून राहुल बजाज पायउतार होणार असल्याचे कंपनीने शेअरबाजाराला कळविल्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात चार टक्क्यांनी घट झाली. राहुल बजाज कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत. कंपनीने आज पहिल्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. त्यानुसार कंपनीला झालेला नफा 19 टक्क्यांनी कमी होऊन तो 962 कोटी रुपये झाला आहे. लॉकडाऊनमुळे कंपनीच्या कामावर परिणाम झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला 1195 कोटी रुपयांचा नफा झाला होता. दरम्यान, एकत्रित महसुलाच्या आधारावर व्होडाफोनचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे व्होडाफोन कंपनीच्या शेअरच्या भावात आठ टक्क्यांनी घट झाली.