सरदारशहर – केरळमध्ये स्फोटक अननस खाऊ घालून हत्तीणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. अशाच प्रकारची क्रुर घटना राजस्थानातील चुरूच्या सरदार शहरातील साजनसर या गावात घडली आहे. येथे एका शेतात उंट घुसल्याने तिघांनी कुऱ्हाडीने उंटाच्या पुढच्या पायांवर वार केले. यात उंटाचा एक पाय पूर्ण तुटला आहे. या उंटाचे वय चार वर्षे आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने या उंटाचा जीव वाचला.
उंटाचा आवाज ऐकून काही नागरिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. या उंटाला गावातील गोशाळेत ठेवण्यात आले आहे. येथेच उंटावर उपचार करण्यात आले. याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याबाबत गावातील ओमप्रकाश सिंग यांनी तीन जणांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.