कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने मंगळवारी (२१ जुलै) दूध संकलन व्यवस्थितरित्या चालू ठेवावे. अन्यथा संघावर सहकार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल यासंबंधी गांभीर्याने नोंद घ्यावी अशी नोटीस प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक प्रविण परब यांनी या काढली आहे. गोकुळचे चेअरमन व कार्यकारी संचालकांना नोटीस काढली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दुधाला दर मिळावे यासाठी २१ जुलै रोजी एकदिवसीय राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला गोकुळ दूध संघानेही पाठिंबा द्यावा असे आवाहन स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. त्यानुसार गोकुळ दूध संघाकडून मंगळवारी दूध संकलन होणार नाही अशा बातम्या पसरल्या होत्या.
गोकुळ दूध संघाने दूध संकलन बंदचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी यासंदर्भात विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गोकुळला नोटीस काढली आहे. आणि मंगळवारी दूध संकलन चालू ठेवण्याविषयी कळविले आहे.