पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांनी सात हजाराचा टप्पा ओलांडला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे. जास्तीतजास्त रुग्णांना शोधून त्यांच्या संपर्कातील नागरिकांचे विलगीकरण करण्यावर प्रशासन भर देणार आहे. त्यासाठी 21 कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यामध्ये 8 हजार 400 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी, सेवाभावी संस्था व खासगी रुग्णालयांकडून अहवाल मागविले आहेत.
शहरातील रुग्णसंख्या शनिवारी सात हजार झाली. सध्या 2 हजार 500 रुग्ण उपचाराधीन आहेत. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या व संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता असून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जुलैअखेर शहरातील रुग्णसंख्या दहा हजार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरची आवश्यकता भासणार आहे. सध्या अकरा ठिकाणी कोविड केअर सेंटर आहेत. लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना त्याठिकाणी ठेवले जात आहे. नवीन सेंटरसाठी पुढील तीन महिन्यांकरिता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ केली जाणार आहे.
ए, बी व सी अशा तीन प्रकारात कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे. ए व सी साठी रुग्णवाहिका, लॅब सर्विस व बायोमेडिकल वेस्ट व फक्त सी साठी टेलिफोन, वीज, पाणी, इंटरनेट, मेडिसीन महापालिका पुरविणार आहे. ब वर्गासाठी महापालिका सर्व साधने पुरवविणार आहे. त्यांनी फक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे आहे. तर ए व सी साठी सेंटर चालकांनी इमारत, पीपीई कीट, ग्लोज, थर्मोमीटर, शस्त्रक्रिया साहित्य, सॅनिटायजर, संगणक सुविधा उपलब्ध करायची आहे.