जेजुरी -पुरंदर तालुक्यात करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून आज 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जेजुरीतील हाय रिस्क संपर्कातील एका 72 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, त्यामुळे आता तालुक्यातील मृतांचा आकडा 6 झाला आहे. जेजुरीत रुग्णांची संख्या वाढत असून गुरुवारी (दि.9) चाचणी घेतलेल्या हायरिस्कमधील 60 जणांमधील 8जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.
जेजुरी रेल्वेस्टेशन परिसरात करोनाचे रुग्ण सापडल्याने गुरुवारपासूनच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाच दिवसांचा लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जेजुरीत अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद व शुकशुकाट आहे. तालुक्यात करोना रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी तालुक्यातील जनतेने करोना महामारीचा प्रतिकार करण्यासाठी सर्व नियम पाळावेत. सूचनांचे पालन करावे. असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत आणि खंडेरायाचे तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी नगरीत कोणीही भाविकांनी देवदर्शन वा धार्मिक विधींसाठी येऊ नये, नागरिकांनी घरात रहावे, सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन व सूचना नगरपालिका, महसूल, व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. गेली चार महिन्यांपासून प्रशासन यंत्रणा कार्यतत्पर राहून महामारीचा सामना करीत आहे.