पुणे – शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छ सेवा सहकारी संस्थेला दिला जाणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात दहा रुपयांची वाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. सध्या हा भत्ता 10 रुपये आहे, तो 20 रुपये करण्याचा हा प्रस्ताव आहे.
दोन लाख घरांपैकी सध्या 1 लाख 65 हजार घरांमधून कचरा गोळा करण्यात येतो. स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सेवाशुल्क मिळणेही या काळात अवघड झाले होते. इमारतींमध्ये कचरा वेचकांनाही प्रवेश नव्हता. इमारतींच्या खालीच हा कचरा गोळा करून दिला जात होता. त्यामुळे सेवाशुल्क मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरात सध्या 650 कचरावेचकांकडून कचरा गोळा केला जातो. प्रोत्साहन भत्यामध्ये वाढ झाल्यास महापालिकेला 1 कोटी 98 लाख रुपये या संस्थेला द्यावे लागतील.
घरांमधला कचरा गोळा केल्यानंतर यामधील भंगार विकून पैसे मिळवले जात होते. बऱ्याच ठिकाणी आता भंगार मिळत नाही. दुकाने बंद आहेत. त्यामुळे कचरावेचकांची परिस्थिती अडचणीची झाली आहे. या प्रस्तावाला मान्यता दिल्यास कचरा वेचकांचा प्रोत्साहन भत्ता वाढणार आहे.