आरोग्य यंत्रणेची तारांबळ; नव्या बेडसाठी धावपळ
पुणे – शहरात करोनाबाधित सापडणे सुरू झाल्यानंतर पहिले अडीच महिने एकूण बाधितांच्या तुलनेत सक्रिय बाधितांचा आकडा दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल 40 दिवसांचा होता. मात्र, मागील आठवडाभरात हा कालावधी 17 दिवसांवर आला आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात उभारलेले करोनावरील उपचाराचे बेड्स तसेच खासगी रुग्णालयांचे बेडस् कमी पडत आहेत. त्यामुुळे नवीन बेडस् मिळवण्यासाठी महापालिकेची धावपळ सुरू आहे.
शहरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वर्दळ वाढली आहे. परिणामी, करोनाची साथ मागील महिनाभरात वेगाने पसरली आहे. 17 जूननंतर या साथीने शहरात उग्र रूप धरण करण्यास सुरुवात केली.
जूनच्या शेवटच्या दोन आठवड्यांत शहरात दररोज सरासरी 500 बाधित आढळत होते. हा आकडा जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत 1 हजारावर गेला आहे. त्यामुळे नव्याने सक्रिय बाधितांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा कालावधी 27, तर 9 जुलै रोजी हा कालावधी अवघ्या 17 दिवसांवर आला आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.