कर्वेनगर – महापालिकेने घेतलेल्या चाचणीत करोना अहवाल पॉझिटिव्ह तर खासगी लॅबच्या तपासणीत तोच अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पालिकेच्या करोना तपासण्यांबाबत शंका निर्माण होत आहे.
कर्वेनगर येथील गोसावी वस्तीमधील एकाची करोना तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना फोन करून अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. पण, चार दिवसानंतरही प्रशासनाकडून कोणीच आले नाही. त्यामुळे घरीच क्वारंटाइन झालेल्या संबंधित नागरिकाने खासगी लॅबमध्ये तपासणी करून घेतली. यामध्ये अहवाल निगेटिव्ह आला. त्याच दिवशी पालिकेचे आरोग्य कर्मचारी न्यायला आले, तेव्हा त्या नागरिकाने खासगी लॅबचा अहवाल त्यांना दाखवला, त्यामुळे नक्की काय करायचे?, असा प्रश्न निर्माण झाला होता.
यावेळी संबंधित व्यक्तीला घरी थांबण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे संभ्रम निर्माण होत असून भीती पसरत असल्याचे राष्ट्रवादीचे किशोर कांबळे यांनी सांगितले.