नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील बंदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेख वसीम असे हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव आहे. वसीम यांच्यासह त्यांचे वडिल आणि त्यांचा भाऊ यांना गोळ्या घालून दहासहवाद्यांनी ठार केले आहे. बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजपा कार्यकर्ता वसीम बारी यांच्यावर गोळीबार केला. अंदाधुंद केलेल्या गोळीबारात वसीम बारी, त्यांचे वडिल बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली.
शेख वसीम हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते आणि आपल्या कुटुंबीयांसोबत एका दुकानाजवळ बसले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी त्यांच्यानजीक कोणीही नव्हते. तसेच सुरक्षा रक्षकही उपस्थित नव्हता. वसीम यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. दरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांनी खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांना आपलं कर्तव्य योग्यरित्या न बजावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
वसीम यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आठ सदस्यीय सुरक्षा टीम पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हतं, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने जम्मू काश्मीरचे पोलीस डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील शोक व्यक्त केला. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनीदेखील या घटनेचा निषेध केला. बांदीपोरामध्ये भाजपा नेते वसीम बारी आणि त्यांच्या भावाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येमुळे आम्हाला दु:ख झाले आहे. ८ सुरक्षा रक्षक असतानाही अशी घटना घडली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो, असे राम माधव म्हणाले.