ओतूर/नारायणगाव -करोनाची साथ वेगाने पसरत असून सामान्यांबरोबरच राजकीय पदाधिकारीही या आजाराची शिकार होत आहेत. प्रशासनाशी समन्वय ठेवत या पदाधिकाऱ्यांचा कळत-नकळत लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जुन्नरचे आमदार अतुल बेनके व शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपापली करोना चाचणी करून घेतली. यात दोघांचीही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीदेखील खबरदारी म्हणून दोघांनाही होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आमदार बेनके यांनी म्हटले आहे की, समस्त जुन्नरकरांसाठी आज मी एक महत्वाची माहिती आणि संदेश देत आहे. योग्य ती काळजी घेत असलो तरीही कामानिमित्त फिरताना कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क आल्याने आणि काही प्रमाणात लक्षणे आढळून आल्याने सोमवारी (दि. 6) मी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करोना टेस्ट करण्यात आली व सुदैवाने ती निगेटिव्ह आली आहे. तसेच 11 जुलै रोजी दुसरी टेस्ट करण्यात येणार आहे; परंतु खबरदारी म्हणून डॉक्टरांनी त्यांना 7 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले आहे.
तर खासदार कोल्हे हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना अनेक राजकीय नेत्यांशी, लोकांशी त्यांचा जवळून संबंध आला. मागील कालावधीत यातील काही राजकीय नेत्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. काही पदाधिकारी उपचारानंतर घरी विलगीकरणात आहेत. तर काहींवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांचा विचार करता करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यामुळे आपल्यासह जनतेच्या आरोग्याचा विचार करता डॉ. कोल्हे हे होमक्वारंटाइन झाले असल्याचे सांगण्यात आले.