सेंट पीट बीच – गेल्या चार दिवसांपासून अमेरिकेत सरासरी 50 हजार करोना रुग्ण सापडत होते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही आकडेवारी घटून 45 हजार इतकी झाली असे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. मात्र 4 जुलैच्या आनंदोत्सवात हजारो जण सहभागी झाल्यामुळे करोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी म्हटले आहे.
शनिवारी अमेरिकेत 45,300 नवीन रुग्ण सापडले असल्याचे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने म्हटले आहे. ही संख्या घटली आहे. याचा अर्थ अमेरिकेतील परिस्थिती सुधारली असे म्हणता येऊ शकणार नाही. देशपातळीवरील सुटीमुळे रुग्णांच्या नोंदणीत घट झाली असावी, असे युनिव्हर्सिटीने म्हटले आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 28 लाख रुग्ण नोंदले गेले असून 1 लाख 30 हजार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मात्र या आकडेवारीमध्ये निदान न होता मृत्यू पावलेल्या नागरिकांची नोंद नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बाधा अथवा मृत्यू झालेला आकडा यापेक्षा अधिक असावा, असा जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतील तज्ञांचा अंदाज आहे. जगभरात 1 कोटी 13 लाख लोकांना करोनाची बाधा झाली आहे आणि 5 लाख 31 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, ब्राझील आणि लॅटिन अमेरिकेतील इतर अनेक देशांमध्ये करोनाचे प्रमाण लक्षणीय आहे. दक्षिण आफ्रिकेत रविवारी एकाच दिवशी 10 हजार रुग्ण सापडले आहेत.