एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीतील कामगाराचे कुटुंबच बाधित
एकट्या संगमनेर तालुक्यात 22 नवे करोनाबाधित
नगर (प्रतिनिधी) – शहरासह जिल्ह्यात आज आणखी 41 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. नगर तालुक्यातील नवनागापूर येथे तीन, नगर शहरातील पद्मानगर, भिंगार येथील (गवळीवाडा) दोन, तर संगमनेर, श्रीरामपूर, राहाता येथील प्रत्येकी एक, तसेच पाथर्डी येथील खेरडा येथे दोन करोनाबाधित सापडले आहेत. 60 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आज अखेर नगरमधील एकूण बाधितांच्या संख्येने 618 चा आकडा ओलांडला.
दरम्यान, आज 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवनागापूर येथील एकाच घरातील तिघांना करोनाची लागण झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. एमआयडीसी येथील एका मोठ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला दोन दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेले आई, वडील, पुतणी यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एमआयडीसीमधील कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.या कामगाराला त्रास होत असल्यामुळे तो नागापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा स्त्राव खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेला असता, तो पॉझिटिव्ह आला.
ज्या रुग्णालयात उपचार घेत होता, त्या रुग्णालयात तपासणी करणाऱ्या रुग्णांचा शोध प्रशासनाने सुरु केला असून, त्यातील अठरा जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सकाळी आलेल्या अहवालात नगर शहरातील सावेडी भागातील 61 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.तसेच जिल्ह्यातील 15 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता 400 झाली आहे. आज नगर मनपा नऊ, नगर ग्रामीण चार, संगमनेर आणि पारनेर प्रत्येकी एक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 162 इतकी आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.
नगरमध्ये एकाचा मृत्यू
शहराच्या बाजारपेठेतील एका व्यावसायिकाचा आज सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. या व्यावसायिकाल शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाच दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेले होते.