देशातील व्यापारी व विविध क्रीडा संघटनांचे संकेत
पुणे – बायकॉट चायना मोहिमेला विविध स्तरांवर बळकटी मिळत असल्याचे स्पष्ट होत असतानाच क्रीडा साहित्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी तसेच विविध क्रीडा संघटनांनीही यापुढे चीनकडून कोणत्याही क्रीडा साहित्याची खरेदी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात, सध्या जो माल आलेला आहे त्याची विक्री केली जाणार असून यानंतर मात्र चीनच्या साहित्याला पर्याय स्वीकारले जातील, असेही काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
करोनाचा प्रसार तसेच लडाखमधील परिस्थिती यांसाठी चीन जबाबदार असल्याने देशात चीनविरोधी असंतोष पसरला असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच भारतातील विविध क्रीडा संघटनांना चीनच्या ली नींगसह अनेक क्रीडा साहित्य बनविणाऱ्या कंपन्यांचे प्रायोजकत्व आहे. मात्र, देशाभिमानाला महत्त्व देत क्रीडा साहित्य विक्री करणारे व्यापारी व देशातील क्रीडा संघटनांनी यापुढे चीनच्या मालाची आयात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. चीनमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचे उत्पादन करतात.
अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीतील प्रसिद्ध ब्रॅण्ड असलेल्या साहित्याची निर्मितीही चीनमधील कंपन्या करतात. रिबॉक कंपनीच्या कित्येक वस्तूंचे उत्पादन चीनमध्ये केले जाते व त्यावर मेड इन चायना असा लोगो असतो. त्यामुळे चीनकडून वस्तू आयात करताना यापूर्वी पाहिले जात नव्हते. मात्र, आता येत्या काळात कोणतेही क्रीडा साहित्य मागवताना ते ज्या देशाचे आहे त्याचीच आयात केली जाईल. तसेच चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंना पर्यायही शोधले जातील, असेही या व्यापाऱ्यांनी सागितले.
चीनला फटका बसणार
चिनी वस्तूंवर बंदी लावणे वाटते तितके सोपे नसले तरीही येत्या काळात काही पर्याय स्वीकारत ही मोहीम यशस्वी करता येईल, यामुळे चीनला निश्चितच फटका बसेल. गेल्या 5 वर्षांतील आकडेवारीनुसार भारतातील क्रीडा क्षेत्रात चीनकडून येत असलेल्या वस्तूंची आयात एकूण आयातीत 55 टक्के होती. ही संपूर्ण उलाढाल जवळपास 80 अब्ज डॉलर्सची आहे, ती कमी झाली तर चीनच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसेल, असा विश्वासही काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.