सोरतापवाडी -गेले पंधरा दिवस लागोपाठ उरुळी कांचन (ता. हवेली) येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (दि. 1) एक व्यापारी (वय 62) पॉझिटिव्ह आला असून, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. उरुळी कांचन येथे लागोपाठ रुग्ण आढळत असल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
आज एक व्यापारी करोनाबाधित आढळून आला असून त्यांच्या संपर्कातील 14 व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉक्टर सुचेता कदम यांनी दिली.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीने कडक पावले उचलण्याची गरज असून, आजसुद्धा विनामास्कचे अनेक नागरिक बिनधास्त फिरत आहेत, त्यामुळे भविष्यात करोनाचे रुग्ण वाढण्याची भीती अनेक नागरिकांनी बोलून दाखविली आहे.