नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्शवभूमीवर देशात लागू करण्यात आलेला लॉक डाउनचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. परंतु, मोदी आज बोलताना कोणत्या विषयावर जनतेला संबोधित करणार, हे अजूनही समजलेले नाही. परंतु, असे म्हटले जात आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ते विविध मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधतील. याव्यतिरिक्त असा अंदाज बांधण्यात येत आहे की, सध्या भारत-चीन यांच्यातील वाढत्या तणावांबाबतही पंतप्रधान काही गोष्टी स्पष्ट करू शकतात.
पीएमओ इंडियाच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करू देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
Prime Minister @narendramodi will address the nation at 4 PM tomorrow.
— PMO India (@PMOIndia) June 29, 2020
पंतप्रधानांच्या संबोधनाआधी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल भारत सरकारच्या वतीने उचलण्यात आलं आहे. सोमवारी संध्याकाळी सरकारच्या वतीने 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउजर यांसारख्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय चिनी अॅप्सचा समावेश आहे. आयटी अॅक्ट 2000 अंतर्गत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.