अनलॉकच्या प्रक्रियेत आता चित्रीकरणांना परवानगी देण्यात आली आहे. अनेक मालिका, रियालिटी शो तसंच चित्रपटांची चित्रीकरणं सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू झाली आहेत. बॉलिवूडमध्ये सध्या नवीन चित्रपटांच्या निर्मितीचे वारेही वाहू लागले आहेत. अनेक कलाकार आता त्यासाठी तयारीला लागले आहेत.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि ग्लॅमरचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देखील तिच्या नव्या चित्रपटातील भूमिकेची कसून तयारी करत आहे. ती सध्या शकुन बत्रा यांच्या एका आगामी चित्रपटासाठी पटकथा वाचन करत आहे. ही भूमिका नेमकी काय असेल, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
दीपिका तिच्या दिवसातला काही वेळ बत्रा यांच्या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी राखून ठेवत आहे. या व्यक्तिरेखेवर प्रत्यक्ष काम सुरू नसलं तरी दीपिका तिची भूमिका उत्तम वठावी यासाठी त्या व्यक्तिरेखाचा अभ्यास करत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.