656 कोटी 38 लाख खर्चास अधिसभेत मंजुरी
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2020-21 या आर्थिक वर्षाचा 595 कोटी 14 लाख रुपये जमेचा व 656 कोटी 38 लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला. एकूण 61 कोटी 24 लाख रुपये तुटीच्या अर्थसंकल्पास अधिसभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात करोनाच्या दृष्टीने काही तरतूद करण्यात आलेली नाही. मात्र, त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या अधिसभेत काही स्थगन प्रस्तावावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला. ही अधिसभा ऑनलाइन पद्धतीने झाली. अर्थसंकल्पात पदव्युत्तर विद्यार्थी आदान-प्रदान करण्यासाठी सेतू कार्यक्रमासाठी 25 लाख, ऐतिहासिक स्थळ दत्तक योजनेसाठी 10 लाख, युवक-युवती उन्नयनीकरण तारुण्यभान उपक्रमासाठी 50 लाख रुपये अशी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठाचा खर्चाचा तपशील…
वेतन-राज्य सरकार अनुदानित : 20%
वेतन-विनाअनुदानित : 10%
प्रशासकीय विभाग : 3%
विद्यार्थी विषयक सेवा व सुविधा : 36%
शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम : 2%
पायाभूत सेवा विभाग : 7%
इमारत बांधकामे, सुविधा, सुधारणा : 9%
स्वतंत्र प्रकल्प व योजना : 13%
अर्थसंकल्पातील खर्चविषयक तरतुदी…
इमारती बांधकामासाठी 26 कोटी 36 लाख रुपये
विद्यापीठ सुविधा-सुधारणांसाठी 4 कोटी 16 लाख रुपये
विद्यार्थ्यांच्या उपक्रमांसाठी : 21 कोटी 87 लाख रुपये
गुणवत्ता सुधार कार्यक्रम : 13 कोटी 20 लाख रुपये
समर्थ भारत अभियान : 1 कोटी 50 लाख रुपये
आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण : 2 कोटी रुपये
हा अर्थसंकल्प करोनाच्या पूर्वी तयार केला आहे. त्यात अनेक सुधारणा कराव्या लागणार आहेत. करोनामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी पुरवणी अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न राहील.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू