वाढीव वीज बिलांमुळे असंतोषाचे वातावरण
कोपर्डे हवेली (वार्ताहर) – महावितरण कंपनीने लॉकडाऊन कालावधीतील वीज देयके एकूण वापराच्या युनिटप्रमाणे वाटप केली आहेत. दंडाची भरपाई युनिटच्या टप्प्यात आकारून महावितरणने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. सुरूवातीच्या काळात शेजाऱ्याचे वीजबिल जास्त आल्याची चर्चा रंगल्या. पण प्रत्यक्षात आपआपले बिल पाहून सगळ्यांनाच शॉक बसला. तांत्रिक गणिताचा सोयीस्कर वापर करून राष्ट्रीय आपत्तीत ग्राहकांची क्रूर थट्टा केली आहे.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना आर्थिक उलाढालीचे पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर निर्णयानुसार तीन महिन्यापर्यंत सर्व वीज बिल, कर्जाचे हप्ते व इतर देयके दंड न आकारता रक्कम भरण्याची मुभा देण्यात आली होती.
31 मे नंतर लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आल्याने वीजवितरणसह सर्व संस्थानी ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. यात महावितरण कंपनीने आर्थिक तूट भरून काढण्यासाठी शक्कल लढविली असल्याचे दिसून येत आहे. तीन महिने वीजबिले न वाटता त्याची कसर महावितरण कंपनीने केली आहे. यात व्यावसायिकता जपून आर्थिक तूट भरून काढण्यासाठीच हा प्रयत्न म्हणजे जणू मास्टरप्लॅन केला आहे, अशी चर्चा आता ग्राहकांमध्ये होत आहे. वीज वितरणने सद्य परिस्थिती लक्षात घेऊन वाढीव बिले देऊ नयेत, अशी मागणी होत आहे.
440 व्होल्टचा शॉक
वीजवितरण महामंडळाच्या नियमानुसार घरगुती मीटरच्या प्रत्येकी एक ते शंभर युनिट वापरासाठी 3 रूपये 46 पैसे तर शंभर ते तीनशे युनिटसाठी 7 रूपये 43 पैसे आणि तीनशे ते पाचशे युनिटसाठी 10 रूपये 32 पैसे आकारण्यात येतात. परंतु, लॉकडाऊन काळातील वीज वापराचे एकत्रित युनिटचे बिलवाटप झाले आहे. त्यामुळे वसूलीत दंडाऐवजी दराचा टप्पा वाढल्याने ग्राहकांना 440 व्हॉल्टचा धक्का बसला आहे.
लॉकडाऊन दरम्यान मीटर बदलण्यासाठी अर्ज दिला होता. परंतु मीटर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. वापर नसताना स्थिर आकाराऐवजी सरासरी युनिट वापराचे बिल दिले आहे. ही एकप्रकारे आर्थिक लूट आहे. याशिवाय “आधी बिल भरा, नंतर तक्रार करा’ असे धडधाकटपणे सांगितले जाते.
शरद पाटील,उ. कोपर्डे हवेली