महापालिकेकडून खासगी लॅबला आदेशाचे पत्र
पुणे – शहरातील खासगी प्रयोगशाळांकडून (पॅथॉलॉजी लॅब) एखाद्या व्यक्तीची करोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल संबंधित रुग्णाच्या ताब्यात देण्यापूर्वी तो पालिकेकडे पाठवावा, अशा आदेशाचे पत्र पालिकेकडून देण्यात आले आहे, असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
केंद्र शासनाकडून करोना चाचणीस मान्यता देण्यात आलेल्या शहरातील 12 खासगी लॅबमध्ये करोनाची चाचणी केली जात आहे. केंद्राच्या नियमानुसार, संबंधित व्यक्तीचा तपासणी अहवाल तयार झाल्यानंतर तो आयसीएमआरला कळविला जातो. त्यानंतर तो केंद्राकडून जिल्हाधिकाऱ्यांना कळविला जातो आणि जिल्हाधिकारी संबंधित महापालिकेस हे अहवाल पाठवितात. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना फोन करून पालिकेच्या आरोग्य पथकाकडून घरून उपचारासाठी नेले जाते.
मात्र, गेल्या काही दिवसात खासगी प्रयोगशाळांकडून आता रुग्णांनाही तपासणी अहवाल तयार होताच तातडीने कळविला जात आहे. परिणामी, हे घाबरलेले रुग्ण तातडीने शहरात उपचारासाठी दवाखाना शोधण्यास बाहेर पडत आहेत. त्यामुळे या व्यक्तींकडून कुटुंबातील इतर सदस्यांना तसेच नागरिकांना संसर्गाची शक्यता असल्याने अहवालाबाबतचे नियम कडक केले आहेत.
आधी अहवाल पालिकेला कळवा…
महापालिकेकडून सर्व खासगी प्रयोगशाळांनी रुग्णांना अहवालाची माहिती देण्याआधी पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती पालिकेस कळविणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर या रुग्णांशी महापालिका संपर्क साधून पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये त्यांची तपासणी करणार आहे. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांना आता अहवाल आधी पालिकेस कळविणे बंधनकारक असणार आहे.