जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – जवळ जवळ निम्मे वर्ष सर्व जग करोना विषाणूच्या साथीने ग्रासलेले आहे. या आपत्तीमुळे जगभरातील व्यवहारच ठप्प होण्याची वेळ आली असताना अद्याप कोणी याचे नावही ऐकले नाही, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मात्र सोमालियातील काही स्थलांतरितांनी आपण अद्याप “कोविड-19′ अथवा करोना विषाणूचे नावही ऐकलेले नाही, असे सांगितले, तेंव्हा आपल्यालाही आश्चर्याचा धक्का बसला होता, असे सोमालियाची राजधानी मोगादिशु येथील संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रम प्रतिनिधी सेलेस्टे सान्चेझ बीन यांनी सांगितले.
सोमालियाच्या सीमेजवळच्या स्थलांतरितांच्या मार्गावर संयुक्त राष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी स्थलांतरीतांकडे करोनाच्या प्रादुर्भावाबद्दल चौकशी केली. लाल समुद्राच्या पलिकडे, युद्धग्रस्त येमेन आणि आखाती देशांकडे जाणाऱ्या मार्गावर हे निरीक्षण सुरू असता काही स्थलांतरितांनी आपल्याला अद्याप करोनाबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले. आतापर्यंत या स्थलांतरितांना तुम्ही कोठून आला? कोठे निघाले आणि का स्थलांतर करत आहात? असेच प्रश्न विचारले जात होते. मात्र सोमालियात करोनाचा शिरकाव झाल्यावर किती जणांना संसर्ग झाला, असे विचारले जाऊ लागले.
गेल्या आठवड्यात सुमारे साडे 3 हजार जणांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यापैकी कोणीही मास्क घातले नव्हते. अन्य सोशल डिस्टंन्सिग तर अजिबातच नसते. हे स्थलांतरित लोक बहुतेकवेळेस शेजारच्या इथिओपियाच्या ग्रामीण भागातील तरुण असतात. बहुतेक जणांनी काहीही शिक्षण घेतलेले नसते आणि काही अशा समुदायातील असतात ज्यांचा इंटरनेटचा वापरही नसतो. ते जेथे चालले आहेत, त्या येमेनमध्ये युद्ध सुरू आहे, हेही त्यांना माहिती नाही. मात्र करोनाबाबत काहीच माहिती नसणे हे धक्कादायक आहे, असे बीन यांनी सांगितले.