आरोग्य निरीक्षकांना वसुलीचे अधिकार
पुणे – करोनाचा संसर्ग रोखण्यासह सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. त्यामुळे गुरुवारपासून रस्त्यांवर विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांवर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याबाबतचे लेखी आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत.
करोना संसर्ग संपेपर्यंत हे आदेश लागू असतील, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. दरम्यान, हा दंड आकारण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांनाच असल्याने त्यांनी ते स्वतंत्र आदेशाद्वारे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक तसेच उप आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत.
शहरात सध्या शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच रस्त्यांवर वर्दळ वाढली असून, अनेक जण मास्क न वापरताच फिरतात. त्यामुळे करोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन घराबाहेर पडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकणी वावर असलेल्या प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.
ग्रामीण भागातही मास्क “कम्पल्सरी’
ग्रामीण व नगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, प्रवास आणि कामाच्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे, या आदेशाचे उल्लंघन केल्यास आता पाचशे ते हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू खाऊन किंवा त्याशिवायही थुंकल्यास अशा व्यक्तींकडूनही दंड आकारण्याची आदेश देण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. या दंडवसुलीचे अधिकार ग्रामसेवक अथवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.