नगर -प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत सभासदांच्या मागणीचा विचार करुन सभासदांना जामीन कर्ज मूळ पगाराच्या 60 पट कमाल मर्यादा 25 लाखापर्यंत केली. त्याचे वाटप गुरुवार दि. 25 जूनपासून सर्व शाखांवर सुरु करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष संतोष दुसुंगे यांनी दिली.
सभासदांचे जामीन कर्जा व्यतिरिक्त सभासदासाठी घरकुल कर्ज, वाहन तारण कर्ज, निकड कर्ज, सोनेतारण कर्ज या सुविधाही चालू आहेत. तसेच गृहकर्जासाठी यापुढे रजिस्टर गहाणखत ऐवजी ई-मॉरगेज ग्राह्य धारणार त्यामुळे सभासदांचा 40 हजारांचा फायदा होईल. सोनेतारण कर्ज निव्वळ 10 ग्रॅमसाठी 33 हजार रुपयेप्रमाणे कर्ज वाटपचाही निर्णय घेतला.
सभासदांसाठी 5 लाखापर्यंत व नाममात्रसाठी 1 लाखापर्यंत कर्जाचीही योजना चालू आहे, असे दुसुंगे सांगितले. या सभेस उपाध्यक्ष नानासाहेब बडाख, संचालक साहेबराव अनाप, बाळासाहेब मुखेकर, किसन खेमनर, अविनाश निंभोरे, बाबासाहेब खरात, सलिमखान पठाण, अशोक भवार, राजू राहाणे, गंगाराम गोडे, अर्जुन शिरसाठ, दिलीप औताडे, सुयोग पवार, विद्युलता आढाव, सीमा क्षीरसागर, उषा बनकर, मंजुषा नरवडे उपस्थित होते.
सभासदांच्या अडचणींचा व कर्ज वाढीचा या संचालक मंडळाने वेळोवेळी विचार करुन सभासदांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी कर्ज वाढीचा निर्णय घेतल्याबद्दल गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, दत्ता कुलट, बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, रामेश्वर चोपडे, राजू साळवे यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.