मॉस्को – दुसरे महयुद्ध समाप्तच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विजय दिन संचलनामध्ये भारतीय लष्कराची तुकडी सहभागी झाली. त्याचा आपल्याला विशेष अभिमान वाटल्याची प्रतिक्रिया या सोहळ्याला उपस्थित असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून निमंत्रण मिळाल्यानंतर राजनाथ सिंह तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आले आहेत.
1941 ते 1945 दरम्यान चाललेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या समप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विजय दिनाचे संचलन अतिशय भारावलेल्या वातावरणात आज पार पडले. मॉस्कोच्या रेड चौकातील या संचलन सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर राजनाथ सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही दलांची तुकडीचा या संचलनातला सहभाग लक्षणीय होता. विजय संचलनातील भारतीय लष्कराचा सहभाग अनुभवणे हे आपल्यासाठी अतिशय अभिमानास्पद आणि आनंदी होते, असे राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
संचलनात सहभागी झालेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीमध्ये सर्व श्रेणींमधील 75 जवानांचा सहभाग होता. रशियाचे सशस्त्र दल आणि अन्य 17 देशांच्या सशस्त्र दलांच्या तुकडीमध्ये भारतीय सशस्त्र दलातील जवानही सहभागी झाले होते, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. या संचलनाची पहाणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, युद्धाचे दिग्गज आणि संरक्षणमंत्री सिंग यांच्यासह पाहुण्यांनी केली.
दुसऱ्या महायुद्धातील मित्र देशांच्या फौजांमध्ये ब्रिटीश सशस्त्र दलाचे प्रमाण सर्वात जास्त होते. उत्तर आणि पूर्व आफ्रिका, पश्चिमेकडील वाळवंटी भाग आणि युरोपातील मोहिमांमध्ये ब्रिटीश सैन्य सहभागी होते. त्यात 87 हजार सैन्य ठार झाले आणि 34 हजार 354 सैनिक जायबंदी झाले होते. भारतीय सैन्य सर्वच आघाड्यांवर युद्धात सहभागी झाले होते. दक्षिण, इराणच्या ताब्यातील मार्गातून रसद, शस्त्रास्त्र, दारुगोळ्याबरोबर अन्नधान्य रशिया, इराण आणि इराकपर्यंत सुखरूप पोहोचवण्याकडेही भारतीय सैन्याने लक्ष दिले होते.
मंगळवारी राजनाथ सिंह यांनी रशियाचे उपपंतप्रधान उरी बोरिसेव यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक विषयांबाबत चर्चा झाली. तसेच संरक्षण सहकार्याचा आढावाही यावेळी घेण्यात आला. व्यापार, आर्थिक व वैज्ञानिक सहकार्याबाबतच्या भारताबरोबरच्या अंतर सरकारी आयोगाचे बोरिसेव हे सहअध्यक्ष आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान यावरच्या उच्च स्तरीय समितीचेही ते संरक्षण मंत्र्यांसह सहअध्यक्ष आहेत. द्विपक्षीय सहकार्य व प्रादेशिक मुद्यांवर उभय नेत्यांमध्ये अतिशय सकारात्मक व फलदायी चर्चा झाली.
संचलनात अत्याधुनिक लष्करी युद्धसामुग्री आणि लष्करी वाहनेही
या वर्षीच्या संचलनामध्ये 14 हजार सैनिक, लष्करी वाहने, 30 ऐतिहासिक टी-34 रणगाडे, अत्याधुनिक लष्करी वाहनेही सहभागी झाली होती. त्यामध्ये एएफव्ही टर्मिनेटर, टी-72 आणि 1 ए अर्माता रणगाडे, 9 के720 इस्कॅन्डर क्षेपणास्त्र प्रणाली आणि अन्य लष्करी हार्डवेअरचाही स्मावेश होता, असे स्पुटनिक इंटरनॅशनलने प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हवाई संचलनामध्ये विमाने आणि हेलिकॉप्टर्सही सहभागी झाले होते, एसयू 25 ने आकाशात रशियन ध्वजांचे पांढरा, निळा आणि लाल रंग अवकाशात रंगविले.