मंचर (प्रतिनिधी) – येथील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा असलेल्या वाहनांना जॅमर लावून मंचर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी आपली वाहने वाहतुकीस अडथळा होतील, अशी उभी करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
शहरामध्ये विविध वस्तू खरेदीसाठी तालुक्यातून दुचाकी, चारचाकी गाड्यांद्वारे नागरिक येतात. शहरातील वर्दळीचा रस्ता म्हणून लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, घोडेगांव रस्ता, पुणे-नाशिक हमरस्ता या रस्त्यावरील वाहनांना किंवा पादचाऱ्यांना अडथळा होईल, अशी वाहने लावून नागरिक खरेदीसाठी दुकानांमध्ये जात आहेत.
या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहतुकीस अडथळा होतील, अशा वाहनांना जॅमर लावून दंड वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे वाहनचालकांनी पोलिसांच्या कारवाईचा धसका घेतला आहे. वाहने पार्किंग करताना वाहतुकीस अडथळा ठरतील, अशी वाहने उभी केल्यास गाडीमालकांना दंड भरावा लागेल, असा इशारा पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिला आहे.