फलटण (प्रतिनिधी) – शेरेचीवाडी (ता. फलटण) येथील आणखी तीन जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, यापूर्वी गावातील दोघांना करोनाची लागण झाली आहे. सध्या शेरेचेवाडी येथील करोनाबाधितांची संख्या पाच इतकी झाली आहे.
मुंबई परिसरातून शेरेचीवाडी (हिंगणगाव) येथे 12 जून रोजी आलेल्या 38 वर्षीय महिलेला दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 जून रोजी करोना झाल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले होते. त्यानंतर सदर महिलेसोबत आलेल्या तिच्या 10 वर्षांच्या मुलाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, संबंधित करोनाबाधित महिलेल्या निकट संपर्कात आलेल्या आणखी तिघांचे रिपोर्ट आज रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 61 व 32 वर्षांचे दोन पुरुष तसेच एका 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सदरच्या तिन्ही व्यक्ती मुंबई परिसरातून आलेल्या आहेत.
आजअखेर 3426 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत की, ज्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. कन्फर्म वार्ड येथे 10, सस्पेक्ट वार्ड येथे 44, तर इंन्स्टिट्यूशनलमध्ये 42 जण असल्याचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.
तसेच 22 जणांचे अहवाल प्रलंबित असून रविवार पेठ आणि मंगळवार पेठ येथील बाधितांच्या संपर्कातील हायरिस्कमधील व्यक्तींचे स्वॅब घेतले होते, मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तालुक्यात सध्या करोनाचे 18 रुग्ण असून बरे आजअखेर 34 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या पाच इतकी आहे. दरम्यान, तालुक्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 57 इतकी झालेली आहे.