खगोलशास्त्रातील अद्भूत घटनेला पुणेकरांना मुकावे लागण्याची चिन्हे
पुणे – भारतात येत्या रविवारी (दि.21) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून, सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रातील अद्भूत घटना असून, खगोलप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र, यावेळी ढगाळ वातावरणामुळे कदाचित हे ग्रहण पाहण्यास अडचणी येऊ शकतील, असा अंदाज खगोल शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. हे ग्रहण सुरक्षा साधनांचा उपयोग करून पाहता येईल.
सूर्यग्रहण म्हणजे काय?
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये ज्यावेळी चंद्र येतो, त्यावेळी सूर्याचा काही भाग झाकला जातो. या अवस्थेला खगोलशास्त्रात सूर्यग्रहण असे म्हटले जाते.
कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?
सूर्यग्रहणाचे वेगवेगळे प्रकार असून, रविवारचे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. यावेळी चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये असल्याने सूर्य झाकला जाईल. मात्र, यावेळी चंद्र हा पृथ्वीपेक्षा अधिक दूर असल्याने, या काळात होणाऱ्या सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे झाकला न जाता, दृष्यस्वरूपातील काही भागाचे चंद्राभोवती रिंगण तयार होते. याच अवस्थेला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटले जाते.
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा
सूर्यग्रहणाबाबत आपल्याकडे अनेक गैरसमजुुती आहेत. नागरिकांनी अशा गैरसमजुतींना बळी न पडता या खगोलशास्त्रीय घटनेबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत, त्याचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
“आयुका’तर्फे विविध कार्यक्रम
“आयुका’ अर्थात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्टॉनॉमी ऍन्ड ऍस्ट्रोफिजिक्स संस्थेतर्फे या सूर्यग्रहणाबाबत अधिक माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात असतील. यामध्ये सूर्यग्रहण कसे पाहावे, याबाबत दि. 18 आणि 19 जून रोजी मार्गदर्शन केले जाणार आहे. तर दि.21 जून रोजी देशाच्या विविध भागांतून दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचे दृश्य नागरिकांना ऑनलाइन पाहता येईल.
पुण्यातून काही प्रमाणात दिसणार ग्रहण
यावेळेचे कंकणाकृती सूर्यग्रहण हे पुण्यातून काही प्रमाणात दिसणार दिसणार आहे. पुण्यात ग्रहणाला सकाळी 10 वाजून 2 मिनिटांनी सुरुवात होईल तर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी ते संपेल. सुमारे तीन तास चालणाऱ्या या सूर्यग्रहणाचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी योग्य ती खबदारी घेणे आवश्यक आहे.