पुणे – संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेतर्फे (डीआयएटी) आयुर्वेदिक घटकांवर आधारित जैविकरित्या विघटन होणाऱ्या “मास्क’ची निर्मिती केली आहे. संस्थेतर्फे या उत्पादनाला “पवित्रपती’ असे नाव दिले आहे. व्यावसायिक निर्मितीसाठी याचे तंत्रज्ञान मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
आयुर्वेदिक घटकांमधील नॅनो फायबर विषाणूपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच आधारावर डीआयएटीमध्ये आयुर्वेदिक उत्पादनांच्या नॅनोफायबरवर आधारित फेस मास्क विकसित केला आहे. हा कपड्यापासून तयार केला आहे. त्या कपड्यामध्ये जीवाणू-प्रतिरोधक आणि विषाणू प्रतिरोधक गुणधर्म असणाऱ्या कडुनिंबाचे तेल, हळद, कृष्ण तुळस, ओवा, काळी मिरी, हिरड अरबी, लवंग, चंदन, केशर यासारख्या वनौषधींच्या अर्काचा वापर केला. हे उत्पादन जीवाणूरोधी, बुरशीरोधी, विषाणूरोधी, सच्छिद्र, उत्कृष्ट जलरोधक (बाह्य स्तर), जलस्नेही/पाणी शोषून घेणारे (आतील स्तर) आणि जैवअपघटनीय आहे. हे उत्पादन हवेच्या माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी मास्क म्हणून नियमितपणे वापरले जाऊ शकेल.
संस्थेने या उत्पदनाबाबत खात्री करण्यासाठी त्याचे एएसटीएम डी-737 मानक, नॅनोफायबर पटल सरंध्रता (मॅट पोर्सिटी), जैवविघटन आणि एएसटीएम मानकांनुसार यांत्रिक गुणधर्मांनुसार उत्पादनाची वायु भेद्यता/श्वास क्षमता चाचणी केली आहे.
वैयक्तीक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) म्हणून संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण उपायांसाठी आणि कचरा व्यवस्थापन सामग्रीसाठी याचे उत्पादन वाढविले जाईल. यात कपडे, हातमोजे, गाऊन, चेहरा संरक्षक, हेड कव्हर इत्यादींचा समावेश असेल.