रेडा -इंदापूर शहरात शनिवारी (दि. 13) दोन करोना बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने जोरदार हालचाली करून रविवारी (दि. 14) करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण 40 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले होते. त्यातील एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये एक वर्षाच्या मुलालाही करोनाची बाधा झाली आहे.
शहरात यापूर्वी आढळलेल्या एका 68 वर्षीय व्यक्तीचा पुण्यात उपचारादरम्यान सोमवारी (दि. 15) मृत्यू झाला आहे. इंदापूर शहरातील पहिला तर तालुक्यातील दुसरा बळी गेल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर पॉझिटिव्ह आढळलेल्या नऊ जणांमध्ये 1, 9, 36, 40 वयाचे चार पुरुष आणि 4, 32, 48, 53, 65 वर्षे वयाच्या पाच महिलांचा समावेश आहे, असे इंदापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले.
इंदापूर शहरात नगरपरिषद, महसूल, पोलीस तसेच आरोग्य प्रशासन यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र मंगळवारी (दि. 16) शहरात एकूण नऊ करोनाबाधित आढळले आहेत. तरी सकाळी टेंभुर्णी नाका येथील इंगोले मैदान येथे भरलेल्या बाजारात नागरिक कसल्याही प्रकारचे नियम पाळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांच्या अज्ञानासमोर प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले.
इंदापूर आज, उद्या पूर्णपणे बंद – नगराध्यक्षा शहा
इंदापुरात एका दिवसांत नऊ रुग्ण आढळून आल्याने इंदापूर शहर बुधवारी (दि. 17) व गुरुवारी (दि. 18) दोन दिवस बंद राहणार असून कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी केवळ दवाखाने व औषध दुकाने खुली राहतील. तर शुक्रवारी (दि. 19) ते गुरुवार (दि. 25) पर्यंत एक आठवडा शहरातील सर्व व्यवहार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.
तरी प्रशासनास सहकार्य करणे अंत्यत गरजेचे असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, भरत शहा, नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, गटनेते गजानन गवळी, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्यासह नगरसेवक व इंदापूर शहर व्यापारी महासंघ पदाधिकाऱ्यांनी केले आहे.