वाघोली (प्रतिनिधी): बकोरी (ता. हवेली) येथील रेशनिंग दुकान परवानाधारक रमाबाई आंबेडकर महिला बचत गट यांच्याकडून रेशनिंगच्या धान्याचा पुरवठा करताना अनियमितता व गंभीर स्वरूपाची चुका झाल्या असल्याने या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असल्याचा आदेश पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी काढला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे मात्र जिल्ह्यातील अनियमित रेशनिंग दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
बकोरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी तक्रारी अर्ज केला होता. यानुसार या स्वस्त धान्य दुकानाची तहसील कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये परवानाधारक रमाबाई आंबेडकर बचत गटाचे दुकान गावठाणात मंजूर असताना वारघडे वस्ती येथे कार्यरत आहे, विक्री रजिस्टर व साठा यांचा मेळ लागत नाही, दुकानामध्ये नोंदवह्या, वजन, मापे, रजिस्टर अद्ययावत नाही अशा विविध त्रुटी आढळून आल्या. तपासणीवेळी बकोरी ग्रामपंचायतीच्या वतीने सदरचे दुकान बंद करण्याबाबत ठराव पारित करून देण्यात आला. तसेच तक्रारदार चंद्रकांत वारघडे व ३८ कार्डधारकांचे जाबजबाब घेण्यात आले. नियमित धान्य मिळत नाही, पावती मिळत नाही, उद्धटपणे बोलतात अशा तक्रारी नमूद करण्यात आल्या.
परवानाधारक यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व धान्य वितरणात अनियमितता, शासनाच्या अटी शर्थीप्रमाणे नोंदवह्या ठेवलेल्या नसल्याने दुकान निलंबित करून अन्य जवळच्या गावातील दुकानदार यांना जोडण्यात यावा असा अहवाल हवेली तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्यामुळे परवानाधारक यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी समक्ष उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आलेले नाही, परंतु रेशनिंग दुकान चालविताना केलेल्या गंभीर चुका, ग्रामपंचायत बकोरी व ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याने परवानाधारक रमाबाई आंबेडकर महिला बचत गट यांची स्वस्त धान्य दुकान परवान्याची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करून स्वस्त धान्य दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी काढला आहे.