पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयातील एका सहायक पोलीस आयुक्तांचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन केले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातही करोनाची एंट्री झाली आहे. तर, पुण्यातील दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
पोलीस आयुक्तांनी खबरदारीचा उपाय म्हणून व्हिजिटर्सला आयुक्तालयात बंदी केली होती. नागरिकांना त्यांच्या तक्रारी ऑनलाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तर, नुकताच त्यांनी व्हर्च्युअल मीटिंगचा पर्याय जाहीर केला होता.
पुणे शहर पोलीस दलात आजवर 52 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील 27 जण बरे होऊन सेवेत दाखल झाले. सहायक आयुक्तांना करोनाची लागण झाल्यावर पोलीस आयुक्तालयातील परिसर निर्जंतुक करण्यात आला. तसेच खबरदारीच्या इतरही उपाययोजना करण्यात येत आहेत.