बारामती (प्रतिनिधी) -जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत येथील सायलीहिल परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या परिसरात 151 वृक्षांची लागवड करण्यात आली. विविध प्रकारच्या 30 पक्षी व प्राण्यांचे माहिती फलक लावण्यात आले.
परिसरातील लहान मुलांना पक्षी व प्राण्यांबद्दल माहिती मिळावी तसेच पर्यावरण संवर्धनाची ओढ लहान मुलांच्यात निर्माण व्हावी या उद्देशाने मंगेशनाना मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायलीहिल येथील परिसरात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, आयर्नमॅन सतीश ननवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
बारामती टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक चंकेश्वर यांच्या सहकार्यातून हे वृक्षारोपण करण्यात आले असून नागरिकांनी या वृक्षांचे पालकत्व स्वीकारले आहे. यावेळी स्लो सायकलिंग स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते.शारीरिक अंतर ठेवत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.