तसं पाहायला गेल्यास भारतामध्ये टिक-टॉक हे ऍप्लिकेशन नेहमीच या-ना त्या कारणाने वादाच्या गर्तेत अडकलेलं दिसतं. मध्यंतरी तर सोशल मीडियावर टिक-टॉकची रेटिंग घटवण्यासाठी एक मोहीमच चालवली गेली होती. असो टिक-टॉक वापरणे योग्य की अयोग्य हा वादाच्या विषय असला तरी या शॉर्ट-व्हिडीओ मेकिंग ऍप्लिकेशनमुळे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे साक्री तालूक्यातील दिनेश पवार आणि लखानी पवार ही नवरा बायकोची जोडी! टिक-टॉकीवरील आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्यांमुळे मिस्टरअँड मिसेस पवारअल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोताखाली आले.
शेताच्या बांधावर अगदी सामान्य पेहरावात व्हिडीओ सादर करणाऱ्या या पवार जोडीचं आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी कौतुक केलं आहे. दिनेश पवार आणि लखानी पवार यांचं टिक-टॉक खातं तपासल्यास त्यांच्या व्हिडिओंसोबत अनेक दिग्गज कलाकारांचे ड्युएट व्हिडीओ सापडतील. मात्र आता या टिक-टॉक स्टार्सची ख्याती सातासमुद्रापार गेली असल्याचं पाहायला मिळतंय.
त्याचं झालं असं की, ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा देखील टिक-टॉकवर बराच ऍक्टिव्ह असतो. डेव्हिडने टिक-टॉकवर नुकताच एक ड्युएट व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये तो साक्रीच्या पवार कपलच्या कलागुणांचे कौतुक करत आहे. या व्हिडिओमध्ये डेव्हिडची पत्नी कँडी ही देखील दिसत असून तीही पवार नवरा-बायकोला चिअर करताना दिसतीये.
https://vm.tiktok.com/ohuoKV/