पुणे(प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभाग आणि मान्यताप्राप्त संशोधन केंद्र येथे संशोधन करणाऱ्या एमफिल व पीएचडीच्या विद्यार्थ्यांची करोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या मौखिक परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेता येणार आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.
विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्र दि. 1 ते 30 जून या कालावधीत शैक्षणिक कामकाजासाठी बंद राहतील. परंतु या कालावधीत आवश्यकतेनुसार ऑनलाईन अथवा दूरस्थ माध्यमातून शैक्षणिक कामकाज करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनने दिल्या आहेत.
तथापि, शासनाने मार्च 2020 मध्ये घोषित केलेल्या लॉकडाऊनपूर्वी विद्यापीठ व संशोधन केंद्र येथे पीएचडी व एमफिल संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संशोधनाचे काम पूर्ण झाले होते. त्यांना मौखिक परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे निश्चित केलेल्या मौखिक परीक्षा स्थगित करण्यात आले. त्यामुळे ही मौखिक परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शकतत्वे व शासनाने दिलेल्या सूचनेनुसार या संशोधक विद्यार्थ्यांचे मौखिक परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेता येणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांचे मौखिक परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत, त्यांची मौखिक परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याबाबतची कार्यवाही करावी, असे विद्यापीठाने सर्व संशोधन केंद्राना दिले आहेत. संबंधित मार्गदर्शकांकडे (गाईड) संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांची संशोधनाबाबतची संपूर्ण माहिती “पीएचडी ट्रेकिंग सिस्टिम’ यावर अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने स्पष्ट केले आहे.