दुबई – सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 8 गडी राखून नमवून जेतेपद पटकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विक्रमी पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने टी-20 क्रिकेटमधील विश्वविजेतेपदाचा दुष्काळ आजअखेर संपवला.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलिया संघाने 19 षटकांत 2 बाद 173 धावा करत विजयाची नोंद केली. या पराभवामुळे केन विल्यम्सनचे झंझावाती अर्धशतक व्यर्थ ठरले.
विजयासाठी 173 धावांचं खडतर आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार एरॉन फिंच केवळ 5 धावा करून तंबूत परतला. मात्र डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी धुंवाधार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची सामन्यावरची पकड मजबूत झाली.
दरम्यान ट्रेन्ट बोल्टने वॉर्नरला तंबूचा रस्ता दाखवला. तोपर्यंत वॉर्नरने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा करत आपले काम पूर्ण केले होते. त्यानंतर मिचेल मार्श याने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीत ऑस्ट्रेलियाचा विजय साकार केला. मार्शने 50 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 77 धावा केल्या. तर मॅक्सवेलने नाबाद 28 धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. सलामीवर मिचेल डेरिलने ११ धावा केल्या.. तर मार्टीन गुप्टीलने 28 धावा केल्या. दोघं बाद झाल्यानंतर विल्यम्सनने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. विल्यम्सनने 48 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 85 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 172 धावांची मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर ऍडम झाम्पाने एक गडी बाद केला.