नगर -शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शहरासह जिल्ह्यात घरोघरी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. नालेगाव येथील एका निवासी अपार्टमेंटच्या बाहेर शिक्षकांनी एकत्र येऊन फिजीकल डिस्टीनसचे पालन करुन आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी शिक्षक परिषदेचे प्रा. सुनिल पंडित, बाबासाहेब बोडखे, रंगनाथ लबडे, प्रा.विष्णू ससे, सखाराम गारूडकर, प्रा.सुनिल सुसरे, किशोर दळवी, प्रा.विलास साठे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक परिषदेने महाराष्ट्रात 4 व 5 जून रोजी दोन दिवसीय आत्मक्लेश आंदोलनाची हाक दिली होती. यामध्ये शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक वर्षापासून शिक्षकांच्या मागण्या प्रलंबीत आहे. वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सदरील प्रश्न सुटत नसल्याने शिक्षक घरामध्येच आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना 1 एप्रिल 2019 पासून 20 टक्के वेतन अनुदान व वाढीव वेतन देण्याबाबतचा निर्णय तात्काळ निर्गमित करावा, नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढून अनुदानास घोषित करावे. अशी मागणी आहे.