‘करोना’ काळातही आठ कोटींचे उत्पन्न : निम्म्याहून अधिकने घटली नोंदणी
पिंपरी – सरकारी तिजोरी भरण्यात मोठे योगदान देणारी सह-दुय्यम निबंधक कार्यालये 18 दिवसांपूर्वी पुन्हा उघडण्यात आली. परवानगी मिळताच शहरातील प्रलंबित असलेली दस्त नोंदणी पुन्हा सुरु झाली आणि अवघ्या 17 दिवसातच 416 दस्तांची नोंदणी झाली. शहरात एकूण सात दुय्यम निबंधक कार्यालये आहेत त्यापैकी चार कार्यालयाचे काम सुरु झाले आहे, तर तीन अद्याप बंदच आहेत. या चार कार्यालयांनी 8 कोटी 18 लाख 49 हजार 540 इतके उत्पन्न सरकारला मिळवून दिले आहे. त्यामध्ये मुद्रांक आणि नोंदणी शुल्काचा समावेश आहे.परंतु “करोना’मुळे दस्त नोंदणीचा वेग निम्म्याहून अधिकने घटला आहे.
पिंपरीतील दोन, चिंचवड आणि आकुर्डीतील प्रत्येकी एका कार्यालयांमध्ये गेल्या 17 दिवसांत एकूण 416 दस्तांची नोंदणी झाली आहे. लॉकडाऊनपूर्वी सह-दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दिवसाला सरासरी 25 ते 40 दस्तांची नोंदणी होत होती. सध्या फक्त 10 ते 15 दस्तांची नोंदणी होत आहे. काही कार्यालयांमध्ये तर ही संख्या 5 ते 8 दस्त नोंदणीपर्यंत आली आहे.
लॉकडाऊन सुरू असल्याने शहरातील सह-दुय्यम निबंधक कार्यालये 20 मार्चपासून बंद होती. त्यामुळे सदनिका, दुकाने, जमीन-खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाले होते. ही कार्यालये पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी जोर पकडत होती. त्या पार्श्वभूमीवर, 19 मे पासून पिंपरी-चिंचवड शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता 4 कार्यालये पूर्ववत सुरू झाली. चिंचवड (हवेली-क्रमांक 5), पिंपरी (हवेली-क्रमांक 18 आणि हवेली क्रमांक-26) आणि आकुर्डी (हवेली क्रमांक – 24) ही कार्यालये सुरू झाली. प्रतिबंधित क्षेत्रात (कन्टेन्मेंट झोन) असल्याने भोसरी येथील एक आणि दापोडी येथील दोन कार्यालये अद्याप बंदच आहे. सुरू झालेल्या कार्यालयांमध्ये कर्मचारी, नागरिक आणि वकील यांना करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुरेसे सोशल डिस्टंसिंग ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याशिवाय, मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.
सर्वांत कमी दस्त नोंदणी
हवेली-18 कार्यालयात सर्वात कमी 77 दस्तांची नोंदणी पिंपरीतील हवेली- क्रमांक 18 या कार्यालयात गुरुवारपर्यंत झाली. संबंधित कार्यालयाला त्या माध्यमातून 1 कोटी 50 लाख 96 हजार 350 रुपये इतके उत्पन्न मिळाले. तर, आकुर्डीतील हवेली क्रमांक – 24 या कार्यालयात 80 दस्तांची नोंदणी झाली. त्या माध्यमातून 2 कोटी 2 लाख 4 हजार 540 रुपयांचे उत्पन्न कार्यालयाला मिळाले.
सर्वाधिक दस्त नोंदणी हवेली-26 कार्यालयात
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सह-दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाल्यापासून गुरुवारपर्यंत (दि. 4) सर्वाधिक दस्त नोंदणी ही पिंपरीतील हवेली – क्रमांक 26 या कार्यालयात झाली आहे. संबंधित कार्यालयात 133 दस्तांची नोंदणी झाली. त्या माध्यमातून 2 कोटी 45 लाख 9 हजार 790 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये मुद्रांक आणि नोंदणी शुल्काचा समावेश आहे. त्या खालोखाल चिंचवड येथील हवेली क्रमांक 5 येथे बुधवारपर्यंत (दि. 3) 126 दस्तांची नोंदणी झाली. त्यांच्या माध्यमातून 2 कोटी 19 लाख 38 हजार 900 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
दस्त नोंदणीमध्ये प्रामुख्याने सदनिकांचे करारनामे, गहाणखत, कुलमुखत्यारपत्र, भाडेकरार यांची नोंदणी सध्या सुरू आहे. ई-टोकन पद्धतीचा त्यासाठी वापर केला जात आहे. टोकननुसार दस्त नोंदणी झाल्यानंतर थेट कार्यालयात नोंदणीसाठी येणाऱ्यांना वेळ निश्चित करून त्यांचीही नोंदणी केली जात आहे.
– एस. सी. बुरसे, प्रभारी सह-दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक 5, चिंचवड.
ई-टोकन पद्धतीनुसार कार्यालयामध्ये सुरू असलेल्या दस्त नोंदणी प्रक्रियेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. सदनिका करारनामा, भाडेपट्टा आणि गहाणखत आदींसाठी सध्या नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
– ए. डी. लाडके, सह-दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक 26, पिंपरी.